गझल-महेश जाधव


उपासमारी असतानाही जगण्याचे बळ
गरिबांमध्ये कुठून येते लढण्याचे बळ?

मला मागची गर्दी चिरडुन टाकू शकते
फक्त एवढी धास्ती देते पळण्याचे बळ

पुढे कदाचित मनासारखे होईल सगळे
या आशेने मला पुरवले हसण्याचे बळ 

आगरकर भिमराव फुले टिळकांना वाचुन
तुझ्यात सुद्धा येऊ शकते लिहण्याचे बळ

दुनियेमध्ये अजून थोडे दिवस थांबतो
मला फक्त दे खोटे खोटे हसण्याचे बळ

असेल इच्छा शेवटची मरताना माझी
फुलांप्रमाणे मिळो मला दरवळण्याचे बळ

~महेश जाधव.

दगड मनावर ठेवू शकतो फार फार तर
फक्त बोलणे टाळू शकतो फार फार तर

धाक राहिला नाही माझा अश्रूंवरती
मी डोळ्यांना लपवू शकतो फार फार तर

ज्या जागेवर तुला पाहिले मी पहिल्यांदा
त्या जागेला विसरू शकतो फार फार तर

ती माहेरी आल्यानंतर तिला फक्त मी
डोळे भरून पाहू शकतो फार फार तर

निसर्ग अपुल्या हातामध्ये नाही मित्रा
आपण झाडे लावू शकतो फार फार तर

©#महेश_जाधव...

ओठ ओठांवर तुझ्या ठेवून पाहू का ?

मी नशेमध्ये जरा झिंगून पाहू का ?


काल पावेतो जरासा सभ्य होतो पण
लाज आता पूर्ण मी सोडून पाहू का ?

मी तिच्याशी बोलण्याचे टाळले होते
पण तिच्याशी एकदा बोलून पाहू का ?

हाकही  देऊन त्यांनी ऐकले नाही
आर्त किंकाळी अता मारून पाहू का ?

लक्ष नव्हते आजवर माझ्याकडे माझे
मी स्वतःची काळजी घेऊन पाहू का ?

सारखा आहे विचारत आत लपलेला
एकदा त्याला खरे सांगून पाहू का ?

रोज हक्काने इथे मागून थकलो मी
पाय त्याचे एकदा चाटून पाहू का ?


©महेश जाधव

मला भेटल्यानंतर थोडी चिडायची पण
सोबत माझ्या फार वेळ ती रमायची पण

मीच स्वतःची समजुत काढू शकलो असतो
मला पाहिजे होती संधी रडायची पण

तिला पाहिल्यानंतर सगळे विसरत होतो
जिकडे तिकडे फक्त मला ती दिसायची पण

एकच संधी आयुष्याला बदलू शकते
ठेव तयारी त्या संधीला बघायची पण

मीच स्वतःची रोज परीक्षा घेत राहतो
पडायची पण हसायची पण लढायची पण

काय पाहिजे तुला आणखी #महेश आता
हौस भागली नाही का रे लिहायची पण

महेश जाधव..

कधीच घडले नव्हते त्याचा एक पुरावा
त्या लोकांना कुठे मिळाला एक पुरावा

अपुल्यामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी
खोटा सादर केला होता एक पुरावा

प्रत्येकाला मांडू द्यावी त्याची बाजू
खरा कदाचित निघेल त्याचा एक पुरावा

घरी परतलो तेव्हा कळले तिथे राहिला
तुझ्या नि माझ्या भेटीमधला एक पुरावा

तिने सोडले याचे कारण आज कळाले
समोर आली घेउन जेव्हा एक पुरावा

--------------------------------------------

 मी तुझ्या फोटोस आता पाहण्याचे टाळतो
धार दुःखाला नव्याने लावण्याचे टाळतो

झोपलो की बाप दिसतो टांगलेला फासही
त्यामुळे मी कैक वेळा झोपण्याचे टाळतो

आवडाया लागली आता जखम माझी मला
मी मलम जखमेवरी या लावण्याचे टाळतो

लोक सारे संशयाने पाहती माझ्याकडे
मीच मग पाहून तुजला पाहण्याचे टाळतो

एकदा रुसल्यावरी ती बोलण्याचे टाळते
यामुळे तर मी तिच्याशी भांडण्याचे टाळतो

लग्न जमले ही खबर कळताच तेव्हापासुनी
मी तिच्या गल्लीत चक्कर मारण्याचे टाळतो

हारलो जर मी इथे तर चेहरा खुलतो तिचा
यामुळे डावास हल्ली जिंकण्याचे टाळतो

फार सलगी ठेवणेही फार नसते चांगले
अन जगाशी भांडणेही फार नसते चांगले

कायद्यावरती तुझा विश्वास आहे पण तरी
सत्य उकरुन काढणेही फार नसते चांगले

ती तुझ्यावर प्रेम करते पण तरी लक्षात घे
गावभर हे सांगणेही फार नसते चांगले

भामटेपन आपल्या रक्तात ठेवा मोजके
सभ्यतेने वागणेही फार नसते चांगले

भेटली संधी कुठे तर व्यक्त झाले पहिजे
हातचे तू सोडणेही फार नसते चांगले

जर तिला भेटायचे तर शोध तू एकांत स्थळ
व्यस्त जागी भेटणेही फार नसते चांगले

-------------------------------------------------

 इतकीच खंत आहे की सांगता न आले
होते मनात माझ्या ते बोलता न आले!

चाहूल लागली की दुष्काळ येत आहे
दाणे मुठीतलेही मग पेरता न आले!!

सल्ला हसायचा मी देऊ कसा कुणाला
माझेच दुःख मजला सांभाळता न आले!

माझ्या समोर तेव्हा रस्ता तयार होता
ध्येयाकडे तरीही मज धावता न आले

रस्त्यात भेटल्यावर तू हासलीस तेव्हा
हासून आसवांना पण टाळता न आले

 ----------------------------------------------

सध्याच्या या परिस्थितीला बदलू शकलो असतो
निसर्ग आपण सही सलामत ठेवू शकलो असतो

प्रत्येकाला दुःखाचे मुळ कारण कळले असते
जेव्हा आपण बुद्ध खरोखर समजू शकलो असतो

वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्या दोघांना कळले
मुलांस आपण अजुन चांगले घडवू शकलो असतो

उगाच आपण कोसत देतो परिस्थितीचे कारण
हे घडले जर नसते तर मी जिंकू शकलो असतो


-----------------------------------------------------
तिला भेटायला कारण नवे शोधायचो तेव्हा
तिच्याशी बोलण्यासाठी किती बोलायचो तेव्हा

तिच्यावर ठेवला होता बघा विश्वास इतका मी
तिच्या साऱ्याच थापांना खरे मानायचो तेव्हा

इथे भेटायचो आपण तुझे कॉलेज सुटल्यावर
घराची वाट दोघे मग कसे विसरायचो तेव्हा

पुन्हा गावात गेल्यावर मला तर हेच आठवते
तुझ्या दारापुढे चकरा किती मारायचो तेव्हा
----------------------------------------------------
यशामागचा हात म्हणू का
जळणाऱ्यांना वात म्हणू का

जन्मापासुन सोबत आहे
मी नशिबाला जात म्हणू का
               
तिच्या सोबती बसलो होतो
जरा वेळ स्वर्गात म्हणू का

जन्म न म्हणता मी जन्माला
मृत्यूची सुरवात म्हणू का

जन्म भेटला उधारीत हा
मी आहे कर्जात म्हणू का

~महेश जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या