ये ढिल दे गोधडीला दोरा ढिल दे....व्वा क्काट...




नववर्ष लागताच पहिला सण येतो तो मकर संक्रांत आणि नव्या वर्षाची सुरुवात होताच आकाशात कुठेतरी एखादा पतंग घिरट्या घालताना दिसायचा.

        आमची एक-दोन दिवसाची संक्रांत नसायची संक्रांतीच्या सात-आठ दिवस आधीच आम्ही तयारीला लागायचो म्हणजे मांजा कोणता बनवायचा इथपासून ते पतंग कोणते व किती आणायचे त्यात गोंडळ, टेकून, ढोल, लालांडया, कालांडया, फुरकी (हे असे आमचे पारंपरिक नावं ) त्यात दीड चा पाऊणचा पतंग. मांजा कोणता तर साखळी, पांडा, जिराफ, डबल हातोडा चे बंडल आणायचे की आयता बरेली आणायचा इथपर्यंत लगबग सुरू व्हायची.

         आता मांजा बनवायचा म्हणजे काच लागते तर मग पुढच टार्गेट असायचं ते काचा गोळा करणं त्यात मग फुटलेल्या ट्युबनळ्या, उडालेले बल्प, काचेच्या बाटल्या, फुटलेले आरसे जे मिळेल ते गोळा करायचं. कधी कधी तर चोरुनही आणायच्या. भंगाराच्या दुकानातून कितीक वेळा अश्या बाटल्या चोरल्यात आम्ही. उकिरड्यावर पडलेल्या त्या गोळा करायच्या आणि संक्रांतीच्या पाच- सहा दिवस आधीपासूनच त्या काचा कुटायला सुरुवात करायची. त्या मग कित्येक वेळा हातात घुसायच्या रक्त निघलं तरी घरच्यांना मात्र सांगायच नाही हे ठरलेलंच होत. तरी घरच्यांना कळलंच तर शिव्या, मार अंगवळणी पडलेला असल्याने त्याच काही वाटत नसायचं.

          आता काचा गोळा करून झाल्यावर दोरा बंडल आणलेले असायचे ते मांजा बनवण्या आधी काही तास पाण्यात भिजून ठेवायचे नंतर एका ठिकाणी निवांत जागा निवडायची आणि तिथे तीन विटांची चूल मांडायची आणि एखादं जुनं खराब झालेलं भांडं घेऊन त्यात चरस (शिरस) उकळायचा एक दोन उकळ्या झाल्या की त्यात रंग टाकायचा पुन्हा एखादी उकळी आली की ते भांडं उतरून खाली घ्यायचं आणि दोरा दाभन मधून ओढून तो तो चरसाच्या भांडयात टेकवायचा आणि त्याच्या पुढे चरस बाहेर सांडू नये आणि योग्य प्रमाणात चरस दोऱ्याला लागावा म्हणून एक कापडी बोळा त्या भांड्याच्या किनाऱ्यावर धरलेला असायचा त्याच्या पुढे एकाने इतके कुटाणे करून गोळा केलेली काचांचा कूट दोऱ्याला लावायचा आणि त्याच्या पुढे परत एक जण त्या दोऱ्याला जास्त काच चिटकू नये म्हणून पुन्हा एक कापडी बोळा लावलेला असायचा आणि पुढे मग तो आसरीला किंवा छोट्या ड्रमला एका स्टँडवर वेल्डिंग केलेली असायची आणि एका साईडला तो ड्रम फिरवायला हँडल असायचं आणि सगळ्यांचे मांजे त्यावर गुंडाळायचो आणि नंतर प्रत्येकाचा मांजा ज्याच्या त्याच्या आसरीला गुंडाळायला सर्व जण मदत करायचे. कधी कधी तर रात्री दोन-तीन वाजून जायचे मांजा बनवायला.संक्रांतीच्या दिवशी वेळ वाया जाऊ नये म्हणून संक्रांतीच्या आदल्या दिवशीचीच पतंगाला शिकळ्या (मंगळसूत्र) बांधून ठेवायच्या.

        दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं भराभर अंघोळ करायची आणि लगेच पतंग वर  सोडायचा. कधी कधी पतंग घ्यायला पैसे नसायचे मग काय करायचं तर पतंग पकडायला जायचं. कटलेले पतंग पकडायचे कधी गावाच्या बाहेर तर कधी काट्याकुट्यातून पळत जाऊन पकडायचा यात बऱ्याच वेळा पडकण्यावरून भांडणं पण व्हायची आणि त्यात पतंग फाडाफाडी पण व्हायची. तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी गत व्हायची. कधी कधी पायात चप्पल नसायची काटे घुसायचे रक्त यायचं पण त्या तंद्रीत काहीच नव्हतं कळत फक्त पतंग पकडायचा हेच ध्येय असायचं. धाब्याची घर असायची त्यामुळे धाब्यावर जास्त जणांना जाण्याची परवानगी नसायची तरी पण धाब्यावर जाऊन पतंग उडवायची मजाच वेगळी होती.  बऱ्याच वेळा खाली घरात स्वयंपाक सुरू असायचा आणि आम्ही वर धिंगाणा घालत असायचो आणि स्वयंपाक करत असताना वरून माती खाली पुरणात किंवा भज्याच्या पिठात आणि इतर पदार्थांवर पडायची काही वेळेस पडलेली माती लगेच दिसायची पण काही वेळेला नजर चुकीने ते लक्षात यायचं नाही जेव्हा दुपारी घरातले जेवायला बसले की जेवता जेवता त्यांना खडे माती त्या पदार्थांमध्ये आहे हे कळायचं आणि मग तिथून पुढे त्या सर्वांचा खापर आमच्यावर फोडलं जायचं. शिव्या ऐकणं ही आमच्यासाठी अगदी रोजचंच असल्याने आम्हाला त्याच काहीच वाटत नसायचं.

          ज्या वेळी अँड्रॉइड मोबाईल नव्हते तेव्हा एखादा स्पीकर जोडून  सीडी प्लेयर वर गाणी लावली जायची..किंवा मेमरी कार्ड मध्ये गाणी भरून आणलेली असायची तीच पेन ड्राईव्ह ला जोडून सगळा धिंगाणा चालायचं. बांबू डालके बारीक कुटना, तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं, बांगो बांगो बांगो, जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला हे सगळे फेमस गाणी लावायची. खर तर त्या दिवशी पतंग सोडून दुसरं काहीच सुचवायचं नाही अगदी भूक लागली हे सुद्धा कळत नसायचं.. घरचे शिव्या देऊन देऊन जेवायला बोलवाचे. हाताला फोड यायचे, बोटं साळायचे पण त्याच काहीच वाटतं नसायचं. इतका आनंद दुसऱ्या कोणत्याच सणाला आम्हाला मिळत नसायचा. मुळात पतंग उडवणे आणि पतंग कापणे हीच एक दिवसाची संक्रांत आमच्यासाठी नव्हती. आमची संक्रांत ही आठ दिवस आधीच सुरू व्हायची आणि सगळ्यात जास्त मजा असायची ती या सगळ्या प्रोसेस ला जी रेडिमेड मांजा आल्यापासून रेडिमेड मांजा घेणाऱ्यांना ती खरी मजा आणि तो अनुभव घेता येत नाहीये. जेव्हा तुम्ही या सगळ्या प्रोसेस चा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला खऱ्या संक्रांतीचा आनंद मिळेल.

       आपलं अस झालंय की पहिले पैसे नसायचे घरून रडून गागुन पैसे मिळवावे लागायचे ते ही फार नसायचे पण हौस लै होती पण आता जीवनाचा पतंग उंच नेण्याच्या नादात आपण आसरी खालीच विसरलो. हातात पैसे असूनही हौस राहिली नाही. पण एक नक्की आहे की हा सण आला की ते जुने दिवस आठवतात आणि एक उत्साहाची, आनंदाची,सुखाची अनुभुती देऊन जातात मग ते काही तासाभरासाठी का असेना..

 व्वा... क्काट..... गेला रे... ये ढिल दे गोधडीला दोरा ढिल दे....

©महेश जाधव
9545094946

https://www.facebook.com/profile.php?id=100006843602840

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या