गावाकडची अज्ञात माणसं (1)


                 वय असावं 65 च्या आसपास. साधारण हे वय नातवांना खेळवण्याचं, तीर्थ यात्रा करण्याचं, देव देव करण्याच वय अस आपण मानतो. पण काही लोकांच्या नशिबात यातील बऱ्याच गोष्टी नसतात. त्यांच पूर्ण आयुष्यच कष्टाने व्यापलेलं असत. नियती कधी धोका देईल सांगता येत नाही. याच नियतीच्या जाळ्यात सापडलेला हा व्यक्ती. आयुष्यभर मुलाबाळांसाठी जगलेला त्यांच्यासाठी हाडाची काड करून रक्ताच पाणी करून उन्हातान्हात रात्रंदिवस राबणारा एक बाप .....

            ऐपतीनुसार जसे होईल तसे दोन्ही मुलींचे आणि दोन्ही मुलांचे लग्न त्याने करून दिले काही महिने सगळं काही व्यवस्थित होत पण सगळं काही सुरळीत चालू देईल ती नियती कसली? घरात भांड्याला भांड लागायला सुरवात झाली. सततच्या या भांडणाला कंटाळून दोन्ही मुलांनी बापाकडे आपल्याला वाटण्या मागितल्या. बापाकडे दुसरा पर्याय नव्हता नाईलाजाने वाटणी करावी लागली. त्यांनतर काही दिवसातच दोघेही वायली राहायला लागले. आई-बापाचाही विचार त्यांनी केला नाही. होत ते सर्व मुलांच्या नावावर करून मोकळा झालेला बाप दुःखी झाला होता पण आयुष्यभर नशिबाने त्याच्यासोबत खेळलेल्या डावपेचांचा अनुभव त्याच्याकडं होता तो दुःखी झाला पण त्याने आशा सोडली नव्हती. जे झालं त्याला आता इलाज नव्हता .आपली मुलं असे निघतील असा कोणाही आई-बापाला स्वप्नातही वाटत नाही. पण तेच काळरात्रीच स्वप्न त्यांच्या नशिबात आलं असावं. दोघे नवरा बायको एका जुन्या कुडाच्या सपरात राहू लागले. या वयातही नाउमेद न होता संसार नव्याने उभारायचा हि आशा धरून जगत होते. मिळेल ते काम करत होते. पोटाला भूक लागते तेव्हा जगातील कोणतही तत्वज्ञान पोटाची भूक भागवू शकत नाही हेच खर... नवरा बायको दोघेही मोल मजुरी करू लागले. जे मिळेल ते काम करू लागले. आयुष्यभर कष्ट करून पुन्हा या वयातही अशी कामे करावे लागणे म्हणजे नियतीचा पलटवाराच म्हणावा ?

               साधारण तीन- चार वर्षापूर्वी माझ्या वडिलांची आणि त्यांची भेट झाली. आमचा शेळ्या मेंढ्यांचा व्यापार असल्याने थोडीफार ओळख होतीच आणि वडीलही त्यांची परिस्थिती जाणून होतेच त्यामुळे वडिलांनी त्यांना शेळी पालन करण्याचा सल्ला दिला जेणेकरून दुसर्याच्या शेतात जाऊन न पेलणारी कामंही त्यांना करावी लागणार नाही. पण एक शेळी घेण्या इतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते . वडिलांनी एक शेळी स्वतःच्या पैशाने त्यांना घेऊन दिली आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा दे असे सांगितलं. काही महिन्यांनी त्यांनी त्या शेळीचे दोन बोकडे विकून आमचे पैसे परत करण्यासाठी आले असता त्यांना अजून एक शेळी घेण्याचा सल्ला दिला आणि तस अजून एक शेळी घेण्याचे ठरवलं. वडिलांनी त्याच पैश्यात त्यांना अजून एक शेळी घेऊन दिली. असाच व्यवहार चालू राहिला दोनच्या चार, चारच्या आठ, दहा शेळ्या झाल्या. उन्हातान्हाची परवा न करता थंडी-पावसात पुन्हा नियतीला हरवण्याची तयारी सुरु झाली. इतके दिवस मुलाबाळांसाठी कष्ट केले पण मुलांनी त्याची जान ठेवली नाही ऐन आरामाच्या दिवसात स्वतःसाठीच कष्ट करण्याची वेळ आली. पण अशाही परिस्थितीत नियतीला हरवण्याची ताकत त्यांनी दाखवली. 

              ‘’कोणताही स्वार्थ न ठेवता गरजूला मदत करायची’’ हे वडिलांचं वाक्य मी प्रत्यक्षात अनुभवलं. ‘’विस्कटलेला संसार सावरायला मी फक्त मदत केली बाकी सर्व त्यांचेच कष्ट आहेत’’ उपकाराची भाषा करणाऱ्या या जमान्यातही वडील किती सहजतेणे हे बोलून जातात. तीन-चार वर्षापूर्वी ज्या माणसाची सकाळ-संद्याकाळची खाण्याची भ्रांत होती आज त्याच माणसाने छोटसं का होईना स्वतःच पत्र्याचं साध घर बांधलंय. या वयातही या माणसाने कष्ट करण्याची तयारी दाखवली अर्थात बायकोची साथही तितकीच महत्वाची होती त्याशिवाय शक्य नव्हतं.
आज त्यांच्याकडे जास्त नाही तरी पण वीस शेळ्या आहेत आणि सगळ काही सुरळीत चाललंय. स्वतःच्या पैशावर मोटारसायकल घेतली. रोज सकाळी गावात येतात डेरीवर दुध घालायला. बायकोच्याही नावावर थोडे पैसे टाकलेत बँकेत. या वयातही तरुणांना लाजवेल असे कष्ट करतो हा माणूस. असे काही मानसं असतात जे आपल्याला एक जगायचं नवं बळ नवी ऊर्जा देऊन जातात. आणि हा ही त्यातलाच एक गावाकडचा अज्ञात माणूस....


      © : महेश भाऊसाहेब जाधव
             📱:-9545094946


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या